Sunday, December 29, 2013

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न - एक विचार

"निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम" या पंक्तीचा सर्वमान्य झालेला अर्थ = मन निवृत्त झाले कि ज्ञानाचा उदय होतो व मोक्षसोपानाचा मार्ग सुलभ होतो. म्हणजे तो मायेपासून मुक्त होतो, नि मग एकच नाथ व बाह्यस्वरूप त्याला उरते व नामरूपी देव उभा ठाकतो. तुकारामामध्ये तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, ऐसी एकरूपता त्याला प्राप्त होते. तू राम कि राम "एकार्णव झाला तरंग, बुडाला तैसा देह, झाला ब्रह्मरूप" हा सामान्य व सरळ अर्थ. 


तसाच अर्थ राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या शब्दांचा अर्थ लागू शकेल का? आपल्या देहाशी याचा संबंध जोडता येवू शकेल का? 

पहिला शब्द 'राम' म्हणजे सामर्थ्य (energy). शरीर निरामय आणि बलवान असणे. वात, पित्त, दोष, धातू हे सम स्थितीला ठेवणे साधकाला आवश्यक आहे. त्याच्या पुढच्या प्रगतीत, साधनेमध्ये शरीर हेच माध्यम म्हणून उपयोगाला आणले जाते. ते शरीर योग्य अवस्थेत पाहिजे तरच कुंडलिनीचा दणका सहन करू शकेल व सर्व प्रक्रियेला टिकून सहस्त्रदालामध्ये जिवाशिवाचे ऐक्य होईल. आनंद उपभोगता येईल.. देवाचे द्वारी खरी ओळख पटेल. "देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी, साधियेल्या".

लक्ष्मण - लक्ष आणि मन. शारीरिक व मानसिक तपाचे संदर्भात आपणास मन स्थिर करावे लागते. यात शरीराची साथ हवी, तर अडचणी विना आपले लक्ष ध्यानाकडे केंद्रित होईल. मन व चित्त एकाग्र केले तर इप्सितावर (उद्दिष्टावर) लक्ष जडेल. "रुपी गुंतले लोचन, चरणी स्थिरावले मन" किंवा "ठायीच बैसोनि करा एकचित्त". सात्विक आहार, विहाराने देह आणि मन देखील स्वस्थ बनते व शारीरिक क्रियाही तशीच  घडते, म्हणजेच  साधनेला योग्य अशी कर्म पुष्टी होते. "चित्ती तुमच्या पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंडित मुखी नाम, तुमचे वर्णने गुण" या अवस्थेला पोचतो - हे मागणेच आहे. ही एकचित्त स्वरुपानुसंधाची क्रिया होय. ही अवस्था म्हणजे मनोनिग्रह, एकाग्रता, विवेक, वैराग्य ही आपोआप येतात.


भरत या अवस्थेमध्ये अष्टभाव जागृत होतात व साधकाची अवस्था "कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप" अशी होते.

शत्रुघ्न या अवस्थेत विषय, कामक्रोधादी षड्रिपू सोडून जातात. "काम क्रोध घर केले रिते". प्रपंचावरील आसक्ती संपून विषय, आसक्ती व षड्रिपू देहातून नाहीसे होवून विवेक व वैराग्य उत्पन्न होते. विषय संपतील - ही साधकाची पूर्णावस्था होय.    


सीता - माया. तो मायातीत होईल व सहजासहजी गुरुकृपेने त्याचा उद्धार होईल. ईश्वराशी तादात्म्यता प्राप्त होईल. "त्याची चुकली येर झार, झाला सुफळ व्यापार". "पुनर्जन्म न विद्यते" हीच मायतीत अवस्था म्हणजेच देह मी हा भाव (अहंकार) नष्ट होईल.


पण यात सद्गुरूचा वाटा खूप मोठा आहे, किंबहुना त्याच्याशिवाय मार्गक्रमणाच शक्य नाही. "या देहीचे त्या देही घातले", किंवा "आपणासारिखे करिती तात्काळ", हे फक्त सद्गुरूच करू शकतात.


नोट: हा एक फक्त विचार आहे, चर्चा नाही.





No comments:

Post a Comment